परभणी,दि.01(प्रतिनिधी) : दिव्यांगांना पूर्वीप्रमाणेच राशनचे धान्य मिळेल, असे आश्वासन जिल्हाधिकारी सौ. आंचल गोयल यांनी दिले आहेत. अंत्योदय योजनेंतर्गत नवीन जीआरच्या अटी दिव्यांग लाभार्थ्यांना रद्द कराव्यात, अशी मागणी सत्यम दिव्यांग संघटनेच्या पदाधिकार्यांनी गुरुवारी (दि.01) जिल्हाधिकारी सौ. गोयल यांची भेट घेवून केली.
परभणी शहरातील अपंगांना या योजनेतून शिधापत्रिका वितरीत करण्यात आल्या. त्या योजनेमुळे आम्हाला दोन वेळचे अन्न उपलब्ध झाले आहे. परंतु, या सरकारने अंत्योदय योजनेतून नावे कमी करण्या संदर्भात प्रयत्न सुरु केले आहेत. वास्तविकतः प्रशासन सक्षम व्यक्तीला बीपीएल असो किंवा अंत्योदय असो अशा अनेक योजनातून लाभ देत आले आहे. परंतु, अपंगांची जगण्याची कुवत नसतांनासुध्दा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, वैवाहिक अशा अनेक समस्यांना तोंड देत ते जगत असतांना या सरकारने मूलभूत गरजांमधील एक गरज म्हणजे अन्न ते ही दिव्यांगाकडून हिरावून घेण्याचे धोरण हे निश्चित क्लेशकारक आहे, असे मत या संघटनेच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केले.
त्यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी राज्य सरकारचे ते परिपत्रक दिव्यांगांसाठी नाही. दिव्यांगांना पूर्वीप्रमाणेच राशन धान्य मिळेल, असे ठोस आश्वासन दिले. दरम्यान, यावेळी सत्यम दिव्यांग मंचचे अध्यक्ष संजय वाघमारे, रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष राहुल शिवभगत, दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गांधारे, सुनील लहाने, सुरेश वाहूळे, अहमद खान, रमेश खंडागळे, एजाज खान, विशाल बनसोडे आदी उपस्थित होते.